sambhajiaarmar.org

संभाजी आरमार स्थापना दिन...

सर्वसामान्यांचा वशिला 'संभाजी आरमार'...!

छत्रपती संभाजी महाराजांची प्रेरणा घेऊन "छत्रपती संभाजी महाराजांची प्रेरणा घेऊन १८ वर्षापूर्वी १४ मे २००८ रोजी संभाजी आरमारची मुहूर्तमेढ रोवली. आजही तो दिवस डोळ्यासमोर उभा आहे, जवळपास १०० माणसांच्या उपस्थितीत समाज कल्याण केंद्र येथे स्थापनेचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यापूर्वी साधारण २००० सालापासून संभाजी ब्रिगेडमध्ये शाखाप्रमुख म्हणून सक्रीय काम केलं होतं. छत्रपती संभाजी महाराजांच्या मुलखावेगळ्या व्यक्तीमत्वाचं लहानपणापासूनच जबरदस्त आकर्षण होतं. त्याचवेळी मनावर शिवपुत्राच्या संघर्षमय जीवनाचा, त्यांनी राष्ट्रासाठी दिलेल्या बलिदानाचा जबरदस्त परिणाम झाला तो कायमचाच. शिवराय तर अगदी बोलता येत असल्यापासुनच प्रत्येक मराठी मुलाच्या जयजयकारचे धनी आहेत. मराठी मातीत जन्माला आलेल्या माणसाला मग तो कोणत्याही जाती-धर्माचा असेना शिवराय शिकवावे लागत नाहीत. कॉलेज जीवनापासूनच छत्रपतींच्या नावाने असलेल्या संघटनेत झोकून देऊन काम करण्याची जबरदस्त इच्छा असल्यामुळे आणि त्याचवेळी संभाजी ब्रिगेडबद्दल माहिती होताच तात्काळ त्या संघटनेचा भाग झालो. याच दरम्यान मा. खेडेकर साहेबांच्या आक्रमक आणि वास्तववादी विचारांच्या प्रभावाने पूर्णवेळ कार्यकर्ता झालो. २००० ते २००८ संभाजी ब्रिगेडमध्ये कुठल्याही पदाची अपेक्षा न करता प्रामाणिकपणे काम केलं. मात्र मनासारखं काम करता यावं, सर्वसामान्य माणसांच्या भल्यासाठी, त्यांच्यावर होणारा अन्याय मोडून काढण्यासाठी, कुणाच्याही बंधनात न अडकता पेटून उठावं, नाठाळ व्यवस्थेला ताळ्यावर आणण्यासाठी प्रभावी दबाव गट तयार करावा अशी सातत्याने मित्रांसोबत चर्चा व्हायची. अशाच चर्चेतून आमचे सुरुवातीपासूनच सहकारी सतीश (भाऊ) भोसले यांनी स्वतंत्र संघटना स्थापन करण्याचा विचार मांडला. सुरुवातीला ही अशक्यप्राय गोष्ट आहे असंच वाटत होतं. कारण माझी आणि माझ्यासोबत असणाऱ्या सगळेच सर्वसामान्य कुटुंबातील असल्याने कोणतीही राजकीय अथवा सामाजिक पार्श्वभूमी नव्हती. त्यामुळे 'आपल्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील माणसाचं संघटना चालवणं काम नाहीं' अशीच ठाम धारणा होती. मात्र सतीशभाऊंच्या सततच्या पटवून सांगण्यामुळे नवीन संघटना स्थापन करण्याचा निर्णय पक्का झाला आणि 'संभाजी आरमार' हे नाव सुध्दा अंतिम झालं, १४ मे २००८ या दिवशी शंभूराजांच्या जयंतीदिनीच संघटनेला नोंदणी प्रमाणपत्र देखील मिळालं. एकाअर्थी हा छत्रपती संभाजी महाराजांचा आशीर्वादच म्हणावा लागेल. मी अध्यक्ष आणि माझा प्रत्येक निर्णयात कोणतीही शंका न घेता सोबत असणारा माझा मित्र, भाऊ शिवाजी (तात्या) वाघमोडे कार्याध्यक्ष अशी सुरुवात झाली. स्थापनेच्या कार्यक्रमात आम्ही संस्थापक अध्यक्ष, कार्याध्यक्ष असुनही स्टेजवर आम्हालाच जागा नसल्यामुळे समोर प्रेक्षकांमध्येच बसलो होतो. मात्र अध्यक्ष म्हणून बोलताना शिवरायांनी जात-पात गाडून केवळ सर्वसामान्य माणसाचं हित डोळ्यासमोर ठेवून हिंदवी स्वराज्य उभारलं आणि त्या शिव विचारासाठी, रयतेच्या राज्यासाठी संभाजी महाराजांनी प्राणाची बाजी लावली, बलिदान दिलं. त्यामुळे शिवरायांचा विचार आणि त्या विचारांसाठी शंभूराजांनी दिलेलं बलिदान यांना प्रमाण मानूनच संभाजी आरमारची वाटचाल राहील हे पहिल्या दिवशीच जाहीर केलं. 'न्यायाला आधार, अन्यायाविरुद्ध तलवार' हेसंभाजीरगब्रीदवाक्य घेऊन संघटनेच्या कामाची सुरुवात झाली. बऱ्याच लोकांनी संघटना चालवणं कुणाचंही काम नाही म्हणून हेटाळणी सुध्दा केली, कधी कधी लोकांच्या चेष्टेच्या सुरांनी निराशा देखील येत असायची. मात्र शिव-शंभूचा तेजस्वी विचार ही निराशा फार काळ टिकू देत नसे. छोटे-छोटे कार्यक्रम, वेगवेगळे उपक्रम, लोकांच्या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवत आक्रमक व अनोख्या पध्दतीने केलेल्या आंदोलनांमुळे जनमानसात संघटनेची विश्वासहर्ता निर्माण झाली. लोकांचा संघटनेकडे ओढा वाढू लागला.हेटाळणीचा सूर कौतुकात आणि नंतर आदरात बदलला. शहर-जिल्ह्यासह राज्यभर उत्स्फूर्तपणे शाखा स्थापन होऊ लागल्या. सर्वच स्तरातील लोक हक्काने अडचणी कामे घेऊन येऊ लागले आणि संघटनेच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांमुळे अवघड कामेही सहज मार्गी लागायला सुरूवात झाली. कार्यकर्त्यांचा जीवापाड विश्वास हीच संघटनेची खूप मोठी शिदोरी आहे. माझ्या तोंडातून निघालेला प्रत्येक शब्द पूर्ण करण्यासाठी कोणत्याही आक्रमक आंदोलनात कार्यकर्ते स्वतःला झोकून देऊ लागले आणि त्यामुळेच संघटनेचा दरारा निर्माण झाला आहे. सर्वसामान्य माणसाची जी कामे लोकप्रतिनिधी देखील करु शकत नाहीत अशी कामे संभाजी आरमारचा साधा 'कार्यकर्ता' देखील चुटकीसरशी करु शकतो अशी ताकत निष्ठावान मावळ्यांच्या जीवावर आज तयार झाली आहे. ही ताकत तयार करण्यासाठी शेकडो कार्यकर्त्यांवर गुन्हे देखील दाखल झाले. तरीही न डगमगता कार्यकर्ते ठामपणे सोबत उभे आहेत. मागील वर्षी तर ३५३ चा गुन्हा दाखल झाल्याने १० दिवस कार्यकर्त्यांना जेलवारी करावी लागली. शौर्यपीठ तुळापूर येथे संभाजी आरमारच्या शेकडो मावळ्यांची साधारण ४० चारचाकी वाहनांसह निघालेल्या रॅलीला अपघात झाला. मात्र अपघात झाल्यानंतर देखील अवघ्या १० ते १५ मिनिटात हा शिवभक्तांचा मेळा त्याच तडफेने 'जणूकाही घडलेच नाही' अशा आविर्भावात शंभूचरणी मुजरा करण्यासाठी बलिदानस्थळी दाखल झाला. अशी किंमत मोजण्याची हिमत असल्यामुळेच हजारो दिव्यांग बांधवांना न्याय मिळवून देऊ शकलो. रिक्षाचालक, विडी कामगार, विद्यार्थी, अडले-नडले गेलेले कुणीही असो या सगळ्यांचा वशिला म्हणजे 'संभाजी आरमार' अशी ओळख निर्माण झाली आहे. प्रतिवर्षी वर्धापन दिनाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांना प्रोत्साहन व वैचारिक दिशा देण्यासाठी घेण्यात आलेले मेळावे, शिवजयंतीचा पालखी सोहळा गर्दीन ओसंडून वाहत असतात. माझ्यासारखा सर्वसामान्य कुटुंबातील माणूस आज नेता म्हणून मान मिळवतो तो या जिगरबाज साथीदारांच्या निष्ठेमुळेच, हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्यांनी या बाटचालीत साथ देखील सोडली. मात्र तात्या, सुधाकर, गजानन जमदाडे, शशी शिंदे, अनंतराव नीळ, निलेश देवकते, सागर संगवे, गिरिश देवकते, प्रकाश डांगे, नेताजी घोडके, तुकाराम जाधव, संगप्पा म्याकल, संतोष कदम, नागेश कणगी, राजेश पाटील, राहल यमगर, राज दवेवाले, व्यंकटेश मद्राल, मल्लिकार्जुन पोतदार, राजू रच्चा, ओम भोसले, मेघराज जाधव, रेखा व्हनकडे, पदमा द्याबनपल्ली, उमा रजपूत अशी अगणित नावं घेता येतील जी माणसं सह्याद्री सारखी मजबूत सोबत आहेत. आज संपूर्ण सोलापूर जिल्हा, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी, बीड, पुणे. मुंबईसह महाराष्ट्रभर संभाजी आरमार घोडदौड करत आहे. संघटनेचा हा बारू रोखण्यासाठी खोटे गुन्हे लादू‌न संघटना संपवण्याचा कट रचला गेला. कट रचणारे पाचोळ्यासारखे उडून गेले. मात्र मर्द मावळ्यांच्या या अभेद्य किल्ल्याचा टवका देखील उडवू शकले नाहीत. १४ वर्षे झाली अशीच जीवनातील सगळी वर्षे शिव-शंभूच्या विचाराने काम करतच राहणार. या सगळ्या वाटचालीत तन, मन, धनाने साथ देणाऱ्या प्रत्येकाला काळजात ठेवून हा लोककल्याण जपण्याचा शिव-शंभूच्या पायी केलेला संकल्प हाच आता माझा जीवनहेतू, माझ्या जगण्याला समृध्द करणाऱ्या, माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या संभाजी आरमारच्या सर्वच मावळ्यांचा माझ्या चासांवर देखील आधिकार आहे. संपुर्ण महाराष्ट्रात शिव विचारांचा प्रभावी दबाव गट तयार करणे आणि सर्वसामान्य माणसाच्या न्याय-हकासाठी अखंड लढत राहून संभाजी आरमारच्या या 'लोकचळवळीला' प्रत्येक घरात स्थान मिळवून देणे हाच संभु चरणी ठामनिर्धार....! जय शिवराय !! जय शंभूराजे !! जय हिंद !! जय महाराष्ट्र !!!....! जय शिवराय !! जय शंभूराजे !! जय हिंद !! जय महाराष्ट्र !!!

सामाजिक बांधिलकी

प्रतिकूल परिस्थितीत दिव्यांग पाल्यांचा सांभाळ करून शिक्षित करणाऱ्या कर्तृत्ववान मातांचा सन्मान

दिव्यांग विद्यार्थ्यांला सायकल भेट

स्नेहालय या अनाथ आश्रमास भेट

शालेय विद्यार्थ्यांना स्कूलबॅग भेट

महिलांना उद्योग व रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हावे म्हणून मार्गदर्शन शिबीर

सांगली परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने उद्धभवलेल्या परिस्थितीत वाढदिवस न साजरा करता शालेय विद्यार्थ्यांना साहित्य देण्याच्या केलेल्या आव्हानाला परिसात देत 523 डझन वया,2220 पेन, 200 स्कूल बॅग, 450 कंपास पेटी व अन्य शालोपयोगी साहित्य प्रत्यक्ष पूरग्रस्त भागातील 11 गावातील शाळांना सुपूर्द

Scroll to Top